फुटबॉलमधील योगदानाबद्दल फारुख शेख यांचा राज्यस्तरीय सन्मान

 फुटबॉलमधील योगदानाबद्दल फारुख शेख यांचा राज्यस्तरीय सन्मान

खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सम्मानित



लियाकत शाह जळगांव

जळगाव जिल्ह्यात फुटबॉलच्या विकासासाठी फारुख शेख यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरीय दखल घेण्यात आली आहे. जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुख शेख यांना १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते शाल आणि प्रमाणपत्रासह वर्ष २०२५-२०२६ साठीचा 'WIFA विशेष सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रामध्ये फुटबॉलच्या विकासासाठी कार्यरत असलेली पश्चिम भारत फुटबॉल संघटना (WIFA), दरवर्षी या खेळात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करते. यावर्षीचा विशेष सन्मान पुरस्कार फारुख शेख यांना व्यक्तिशः प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रमाणपत्रात नमूद आहे की, राज्य आणि जिल्ह्यातील फुटबॉलच्या विकासासाठी दिलेल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाच्या सन्मानार्थ फारुख शेख यांना हा पुरस्कार प्रदान केला जात आहे.

मुंबईतील कूपरेज फुटबॉल मैदानावर आयोजित सत्कार समारंभात, WIFA चे अध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते फारुख शेख यांना शाल, वरिष्ठ उपाध्यक्ष हरीश वोरा यांच्या हस्ते प्रमाणपत्र, माजी मंत्री आणि आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि माजी आमदार मालोजीराव छत्रपती यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुनील धांडे, सचिव प्रा. डॉ. किरण चौगुले आणि खजिनदार सलीम पारकोटे उपस्थित होते.

फारुख शेख यांनी जळगाव जिल्ह्यात फुटबॉल असोसिएशनच्या कार्याचा विस्तार केला आहे आणि खेळाडूंच्या विकासाला चालना दिली आहे. त्यांनी मुला-मुलींसाठी स्पर्धा आयोजित केल्या, शालेय फुटबॉलला प्रोत्साहन दिले, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन केले आणि नवीन व उदयोन्मुख खेळाडूंना संधी देण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्यातील शालेय खेळांशी संबंधित फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक, पंच, शिक्षक आणि अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि याप्रसंगी जिल्ह्यात फुटबॉलच्या विकासाला आणखी गती देण्याची प्रतिज्ञा व्यक्त करण्यात आली.

या कामगिरीबद्दल फारुख शेखचे फुटबॉल असोसिएशनचे संरक्षक अशोक जैन, अतुल जैन, अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक, पंच, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व फुटबॉलप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

फोटो कॅप्शन : फारुख शेख यांचा सत्कार करताना प्रफुल्ल पटेल, मालोजीराव छत्रपती, हरीश व्होरा, विश्वजीत कदम, सुनील धांडे, प्रा.डॉ.किरण चौगुले व इतर.

Comments